An initiative of Gawda, Kunbi, Velip and Dhangar Federation (GAKUVED)
Friday, March 10, 2023
मांडावरील पारंपारीक शिकमोतसवाला सुट्टीची गरज
सुट्टी ऐवजी परिक्षा ठेवल्याने अप्रत्यक्षपणे संस्कृती नष्ट डकरण्याचा डाव....?
दिवाळीची सुट्टी कमी करून शिकमोत्सवाला द्यावी.... ग्रामीण भागात होणारा पारंपारिक
शिकमोत्सव हा एक लोकसंस्कृतीचा मोठा भाग आहे. ह्या शिकम्याला आपल्या राज्यात
"शिगमो", "शिमगो" ह्या ही नावाने संबोधले जाते. काहीही असो ह्या उत्सवातर्फे खरी
आद्य संस्कृती ही गांवात टिकलेली आहे. ही संस्कृती टिकून राहण्यासाठी नवीन पिढीने
शिकणे गरजेची आहे. त्या शिवाय ती टिकणेच शक्य नाही. पण जेव्हा पारंपारिक शिकमोत्सव
सुरू होतो तेव्हा त्याचं वेळी नेमक्या शाळेच्या परीक्षा सुरू होतात, त्यामुळें
शाळेत शिकणारा विद्यार्थी, शिक्षणाशिवाय आपले भवितव्य घडवणे शक्य नसल्याचा विचार
करून परिक्षेत प्राधान्य देतो व आपल्या पारंपरिक शिकमोत्सवापासुन वंचित राहातो. अशा
स्थितीत नवोदित पीढी आपली संस्कृती आत्मसात करूच शकणार नाही आणि टिकवू ही शकणार
नाही. ही संस्कृती / पारंपरिकता टिकवण्यासाठी शाळेत शिकमोत्सवाला सुट्टी मिळायलाच
हवी. त्याशिवाय ह्या संवर्धन कार्याला पर्यायच नाही. कारण कोणतीही गोष्ट नवदित
पीढीने शिकल्या शिवाय टिकणे अशक्य असते. त्यासाठी शिकमोहोत्सवावेळी शाळेला सुट्टी
मिळण्यासाठी नियोजन करावे असे निवेदन ट्रायबल रिसर्च सेंटर गोवा तर्फे अध्यक्ष
देविदास गावकर, सचिव सत्यवान वेळीप आणि सहकारी निलेश वेळीप ह्यांनी कला आणि
संस्कृती खाते व शिक्षण खात्याला दिले आहे. शिकमोत्सव हा सुमार 18/20 दिवस चालणारा
ग्रामीण भागातील लोकांचा सर्वात मोठा सण आहे. ह्या सणांमध्ये विविध प्रकारच्या
नृत्य व गायन कलांच समावेश आहे. खासकरून लोकनाच, लोकगीतें, म्हातन, दिवजोत्सव,
तरगोंत्सव, आरत, चौरंग, श्लोक, तालगडी, तोणयां खेळातील अनेक प्रकार..... असे
कितीतरी उपक्रम ह्या शिकमोत्सवात चालतात. प्रत्येक घरापुढे जसे "आंगण" असते तसे
ग्रामीण भागात प्रत्येक गांवात एक "सामुहिक आंगण" असते त्याला "मांण" ( मांड )
म्हटले जाते. गांवात होणारा शिकमोत्सव हा मांडावर होतो. ह्या मांड संस्कृतीमुळे
गांवचा एकोपा सांभाळला जातो. नवोदित पिढीसाठी ह्यातुन पारंपरिक, सांस्कृतिक आणि
ऐतिहासिक वारसा मंथन होत असतो त्यामुळे नवोदित पीढीकडे त्याचा संबंध जुळतो आणि
संस्कृती संरक्षण कार्याबरोबर संवर्धनाचे ही कार्य होते. अनेक सणासारखा दिवाळी हा
ही सण आहे पण आपल्या गोव्यात तो जास्त दिवस साजरा केला जात नाही. तरी ह्यासाठी
सुमार 18 ते 21 दिवस सुट्टी दिली जाते. ह्या सुट्टीचा तसा काहीच साकारात्मक उपयोग
होत नाही. ह्या दिवाळी सणाला तीन दिवसांची सुट्टी दिली तरी चालते आणि ती उर्वरित
सुट्टी शिकमोत्सवाला द्यावी. जेणेकरून शाळेचा कालावधी कमी होणार नाही आणि अभ्यासावर
कोणताच परिणाम होणार नाही. ह्या सुट्टीमुळे नवोदित पीढी व शिक्षक पारंपारिक
शिकमोत्सवात सहभाग घेऊ शकेल व असे झाले तरच आपली कला संस्कृती संरक्षण आणि संवर्धन
होईल. सांस्कृतिक दृष्ट्या पाहिले तर शिकमोत्सवाला 20 दिवस सुट्टीची गरज आहे. आणि
विशेष म्हणजे दक्षिण गोव्यात शिवरात्री पासून शिकमो सुरू होतो आणि होळीनंतर तीन
दिवसांनी संपतो. तर उत्तर गोव्यात होळी नंत्तर शिकमो सुरू होतो. ह्या सर्व स्थितीचा
विचार केल्यास होळीच्या 10/12 दिवसा पुर्वीपासुन सुट्टी द्यावी व होळी नंतर 5/7
दिवस पर्यंत ती सुट्टी असावी. शिकमोत्सवाच्या काळात होणाऱ्या परिक्षा होळीच्या 10
दिवसांपुर्वी संपवाव्या नाही तर काही दिवस पुढे ढकलून "संवसांर पाडयो" म्हणजे
गुढीपाडव्या नंतर सुरू केल्यास शाळेचे दिवस कमी होणार नाही आणि शालेय शिक्षणावर
कोणताच परिणाम होणार नाही. जेणे करून विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कृती दोन्ही
गोष्टी शिकण्यास मदत होईल ह्यावर शिक्षण अधिकारी आणि तज्ञ लोकांनी विचार विनिमय
करून योग्य ती वाट काढली पाहिजे. गांवातील व सर्व लोक शिकमोत्सवातील पारंपारिक खेळ
खेळण्यासाठी दंग असतात आणि अशा वातावरणात शाळेतील परिक्षा असल्याने मुले अभ्यास
करण्यासाठी बसतात पण सभोवताली शिगमोत्सवाचा गजर व त्या गजरात अभ्यास म्हणजे प्रकारे
मानसिक तणाव निर्माण होण्याचे कार्य आहे.
No comments:
Post a Comment